Chichwad : राहुल कलाटे सर्वांत श्रीमंत उमेदवार; किती आहे संपत्ती ?

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे राहुल कलाटे शहरातील उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे 48 कोटी 41 लाखाची संपत्ती आहे. खेड तालुक्यातील सोळू, मुळशीतील नेरे येथे त्यांची शेतजमीन आहे. त्यांच्यावर 8 कोटी 40 लाखाचे कर्ज असून त्यांच्याकडे एक ‘रिव्हॉल्वर’ देखील आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.

बी-कॉम पर्यंतचे शिक्षण झालेल्या कलाटे यांच्याकडे 47 कोटी 42 लाख स्थावर तर 99 लाख जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर 8 कोटी 40 लाखाचे कर्ज आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँकेत त्यांच्या ठेवी असून एलआयीसीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे मर्सीडीज बेन्झ मोटार आहे. पाच लाख 25 हजाराचे 15 तोळे सोने त्यांच्याकडे आहे. तर, 55 हजार रुपयांची ‘रिव्हॉल्वर’ देखील त्यांच्याकडे आहे.

खेड तालुक्यातील सोळू येथे वारसाप्राप्त त्यांची शेतजमीन जमीन आहे. नेरे, मुळशी येथे देखील त्यांची जमीन आहे. रहाटणीत निवासी इमारत आहे. बिगर शेत जमिनीवर बांधकामाच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूक केली आहे. चालू बाजारभावानुसार त्याची किंमत 46 कोटी 48 लाख रुपये होत आहे. शेती आणि व्यापार उत्पन्नाचे साधन असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.