Chichwad : विद्यार्थ्यांनी गुणवान होण्यासोबतच धाडसीही बनावे–लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – प्रत्येक विद्यार्थ्याने बंडखोर असले पाहिजे. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रश्न पडले पाहिजेत. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पना सुचल्या पाहिजेत. प्रश्न पडले, तर विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढतो. विद्यार्थ्यांनी गुणवान होण्यासोबतच धाडसीही बनले पाहिजे, असे मत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (शनिवारी)  केले.

जिजाई प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित परीक्षापूर्व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे, सभागृह नेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, नगरसेविका आशा शेंडगे, शर्मिला बाबर, नगरसेवक शीतल शिंदे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, महापालिकेचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे, प्रा. दिगंबर ढोकळे संतोष पाचपुते आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ”विद्यार्थ्यांनी आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. स्मरणशक्ती वाढली की बुद्ध्यांक आपोआप वाढतो. तसे झाल्यास प्रत्येक विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या तसेच आयुष्यातही यशस्वी होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या गुणवान होण्यासोबतच धाडसीही होणे गरजेचे आहे. धाडस नसेल, तर आपली गुणवत्ता वंचित राहते. बुद्धिवंतांची चेष्टा होते. विद्यार्थ्यांनी काही गोष्टी आपले पालक आणि शिक्षकांकडून आत्मसात कराव्यात. काही गोष्टी स्वतःहून आत्मसात कराव्यात. आपला देश सुजलाम सुफलाम होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मीठभाकरे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावीच्या मुलांनी उत्तरपत्रिका कशी लिहावी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.