Vinayak Mete : मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीसी न्यूज – शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना याबाबत आदेश दिले आहेत.मेटेंचा अपघात कि घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे.

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांनी आणि समर्थकांनी त्यांचा मृत्यू अपघात की घातपात असा संशयवजा आरोप करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची राज्य सरकारनं आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय.

दरम्यान, मेटे यांच्या निघनामुळे त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून संधी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. शिवसंग्राम संघटना भाजपसोबत युतीत आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीला आमदारकीची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केली आहे.

विनायक मेटे यांच्या कारला पुणे मुंबई एक्स्प्रेसवेवर नुकताच भीषण अपघात झाला. यामध्ये मेटे यांचे निधन झाले. तीन दिवसांपुर्वी रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी संशय व्यक्त केला असून मेटेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.