Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यावर बारीक लक्ष; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतात नियमित आढावा

एमपीसी न्यूज – पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. रुग्णांचा आकडा आता 600 च्या पार गेला आहे. त्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून, त्यांनी आता पुण्यावर बारीक लक्ष केंद्रित केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या फेसबूक लाईव्ह वरील संवादात नेहमीच पुण्याचा उल्लेख करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे नियमितपणे पुण्यातील कोरोनाचा रुग्णांचा आढावा घेत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. पुण्यातील लोकप्रतिनिधीशीही त्यांचा सातत्याने संवाद होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी मुख्यमंत्र्यांनी दुसरा लॉकडाऊन जाहीर केला होता. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या संकटावर आपण मात करणारच असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पुणेकरांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लॉकडाऊन आणखी कडक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराच्या सीमा पूर्णपणे सील करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

पुणे शहराच्या दाटीवाटीच्या भागांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहेत. भवानी पेठ हा सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला भाग आहे. कसबा – विश्रामबाग वाडा, कोंढवा, हडपसर, मुंढवा, येरवडा भागांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे 50 च्यावर बळी गेले आहेत. बावधन – कोथरूड भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत.

ग्रामीण भागातही या रोगाचे प्रमाण कमी आहे. शहरात मात्र रुग्ण काही कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिकेने संपूर्ण पुणे शहर सील करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासाठी पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.