Pimpri: पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी महापौर घालणार मुख्यमंत्र्यांना साकडे!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 22 लाखाच्या घरात गेली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. शहरवासिय तहानलेले आहेत. त्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे अतिशय गरजेचे आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांच्या कार्यालयाशी पत्र व्यवहार केला असल्याचे, महापौर राहुल जाधव यांनी सांगितले. तसेच प्रकल्प मार्गी लावण्याबाबतचे साकडे आपण मुख्यमंत्र्यांना घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बंद पाईप लाइनने पाणी आणण्यास मावळ तालुक्‍यातील शेतक-यांनी विरोध केला होता. 9 ऑगस्ट 2011 ला मुंबई-पुणे द्रूतगती मार्गावर मोर्चाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याच दिवशी राज्य सरकारने या योजनेला स्थगिती दिली, ती आजून उठवली नाही.
मावळवासियांवर झालेल्या या अन्यायामुळे महापालिकेने मृतांच्या तीन वारसांना महापालिकेत कायम स्वरुपी नोकरी दिली. मात्र अन्य 13 जखमींनाही महापालिका सेवेत रुजू करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘शहरवासियांना मुबलक पाणी मिळाले पाहिजे. मावळातील बाधित नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये. त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. त्यांच्या मागण्या मान्य करुन यामध्ये तोडगा काढणे अपेक्षित आहे. नऊ वर्षापासून हा प्रकल्प रखडला आहे. भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी हा प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्यासोबत बाधित शेतकरी, मावळचे लोकप्रतिनिधी, महापालिकेचे पदाधिकारी व अधिका-यांची एकत्रित बैठक घेतली जाईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितीली असून या बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.