Lonavala : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोमवारी सभा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाईचे मावळ विधानसभेचे उमेदवार व राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रचाराकरिता सोमवारी दुपारी बारा वाजता उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा लोणावळ्यातील गुरुद्वारा चौकात होणार आहे.

मावळ तालुक्यात सलग तिसर्‍यांना बाळा भेगडे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे तर पक्षातून बंडखोरी केलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेत भेगडे यांच्यासमोर आवाहन उभे केले आहे. यामुळे मावळची लढत ही राज्यात लक्षवेधी लढत बनली आहे. बाळा भेगडे यांची हॅट्रिक करिता घोडदौड सुरु असताना त्यांना रोखण्याकरिता राष्ट्रवादीने व सुनील शेळके यांनी सर्व शक्तीपणाला लावली आहे. मावळ हा हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा तसेच संघ विचारांचा तालुका असल्याने याठिकाणी हिदुत्वाचे खंदे पुरस्कर्ते असलेले योगी आदित्यनाथ यांची सभा घेण्यात आली आहे.

या सभेकरिता राज्यमंत्री व उमेदवार बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मावळ भाजपाचे प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, राजेश खांडभोर, लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहराध्यक्ष श्रीधर पुजारी हे उपस्थित राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.