chikahli : चिखलीत आजपासून चार दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’; सकाळपासून कडकडीत बंद

A four-day 'public curfew' in Chikhali from today; Strictly closed since morning : समस्त ग्रामस्त चिखली आणि एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीने गुरुवार (दि.9 ) ते रविवार ( दि. 12 ) या कालावधीत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.

एमपीसीन्यूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंस्फूर्तीने गुरुवारी आणि रविवारी ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याच्या महापालिका आयुक्त आणि महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चिखली ग्रामस्थांनी आजपासून ( गुरुवार) रविवार ( दि. 12 ) पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज पहिल्या दिवशी संपूर्ण चिखली गाव आणि परिसरात बंद पाळण्यात आला.

आज सकाळपासून भाजीपाला आणि किराणामालासह अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती.  दूध विक्री सकाळी 7  ते 9 पर्यंत सुरु होती. मेडिकल दुकाने सकाळी 9  ते दुपारी 12  यावेळेत सुरु होती. तसेच सायंकाळी 5  ते रात्री 9  वाजेपर्यंत मेडिकल दुकाने सुरु ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. याशिवाय सर्व दवाखाने आणि रुग्णालयांना या जनता कर्फ्यूतून वगळण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विळखा घट्ट होताना दिसून येत आहे. नागरीकांकडून महापालिका आणि शासकीय निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी शहरात दररोज मोठ्यासंख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये अनेक रुग्णांना प्राणही गमवावे लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर माई ढोरे यांनी शहरातील नागरिकांना स्वयंस्फूर्तीने गुरुवारी आणि रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देत समस्त ग्रामस्त चिखली आणि एक गाव एक शिवजयंती उत्सव समितीने गुरुवार (दि.9 ) ते रविवार ( दि. 12 ) या कालावधीत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार आजपासून चिखली गावठाणासह कुदळवाडी, जाधववाडी, साने वस्ती, नेवाळे वस्ती, सोनावणे वस्ती, मोरेवस्ती, साने चौक, पवार वस्ती, ताम्हाणे वस्ती, पाटील नगर आदी भागात कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.