Chikhali: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा करणाऱ्या 16 दुकानदारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवरून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत गर्दीमधून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाकडे कानाडोळा करून शहरात काही ठिकाणी दुकाने सुरु आहेत. अशी दुकाने बंद करण्याच्या पोलिसांकडून सूचना दिल्या जात असून तरीही सुरु राहणा-या दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

13 मार्च 2010 पासून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगर पंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, नाट्यगृहे, आंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार आहेत. यातून दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत परवानगी देण्यात येऊ नये. तसेच यापूर्वी दिलेल्या परवानग्या रद्द कराव्यात, असेही आदेशात म्हटले आहे.

एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सर्व शॉपिंग मॉल, सर्व दुकाने, सर्व आस्थापना 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधे आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. मात्र, जिलाधिका-यांच्या आदेशाकडे कानाडोळा करून काही दुकानदार दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्या दुकानदारांना समजावण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. समज देऊनही दुकाने सुरु ठेवल्यास पोलिसांकडून संबंधित दुकानदारांवर भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गर्दी टाळण्याबाबत कडक उपाय योजना करण्याचे आदेश पोलीस अधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कठोर कारवाई केली जात आहे. चिखली पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणा-या 16 दुकानचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.