Chikhali crime News : गणेशोत्सव, मोहरमच्या पार्श्वभूमीवर चिखलीतील 21 गुन्हेगार देहूरोड विभागातून हद्दपार

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 21 गुन्हेगारांना चिखली, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

गणेशोत्सव आणि मोहरम दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विविध कारवाया, उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच कोंबिंग ऑपरेशन, पथसंचालन, प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जात आहेत.

चिखली परिसरात वास्तव्यास असलेल्या पोलीस रेकॉर्डवरील 21 गुन्हेगारांवर पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार हद्दपारीची कारवाई केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिखलीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी देहूरोड विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय नाईक-पाटील यांच्याकडे रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला.

त्या प्रस्तावाला सहाय्यक आयुक्त नाईक पाटील यांनी मंजुरी दिली असून 21 गुन्हेगारांना 31 ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजल्यापासून 2 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत देहूरोड विभागातून हद्दपार करण्यात आले आहे.

देहूरोड विभागात चिखली, देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. कारवाई केलेल्या गुन्हेगारांना वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास तसेच वास्तव्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त विनायक ठाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस हवालदार दत्तात्रय कदम, पोलीस शिपाई बाजीराव चौधर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.