Chikhali : बेकरी चालकाला मारहाण करून लुटणा-या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – बर्गरचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून बेकरी चालकाला मारहाण करून लुटले. या प्रकरणातील चार जणांना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 8) रात्री रूपीनगर येथे घडली.

 

नितीन शिंदे, सचिन ऊर्फ अंड्या, रुपेश आखाडे, आकाश ऊर्फ गुंड्या भालेराव (रा. सर्व रा. रुपीनगर, तळवडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या एका अनोळखी साथीदारवरही (नाव, पत्ता माहिती नाही) गुन्हा दाखल झाला आहे. श्रेयस दिलीप गरूडे (वय 25, रा. गंगाभारती हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गरूडे यांचे डब्ल्यू एस बेकर्स नावाचे रुपीनगर येथे दुकान आहे. या दुकानात आरोपी बर्गर खाण्यासाठी आले. दोन बर्गर दिल्यानंतर फिर्यादी यांनी पैसे मागितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दुकान बंद करीत असताना त्यांना लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच दुकान फोडण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील अडीच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

 

चिखली पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.