Chikhali : वाढदिवसानिमित्त महापौर जाधव यांनी 55 जोडप्यांचे केले कन्यादान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराचे महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या सर्व जातीधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात 55 जोडपी विवाहबद्ध झाली.

चिखली, जाधववाडी येथील रामायण मैदानात पारंपरिक रितीरिवाजानुसार सामुदायिक विवाह सोहळा हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला. सध्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक संवेदना जपत महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय 55 जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यम वर्गीय लोकांचा विवाह सोहळा पार पडला.

या विवाह सोहळयाप्रसंगी सर्व 55 जोडप्यांचे कन्यादान हे भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे तसेच त्यांच्या पत्नी शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा पूजा लांडगे, महापौर राहुल जाधव व त्यांच्या पत्नी श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगल जाधव यांच्या हस्ते पार पडले. विवाह सोहळयातील सर्व 55 जोडप्यांना महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनकडून संसारोपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळयातील बैठक व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, काटेकोर नियोजन, लग्नप्रसंगी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन हा सर्व जातीधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरक्षित, शिस्तीत, र्निविघ्नपणे, पार पडण्याकरिता हजारो कार्यकर्ते स्वत: मनापासून अहोरात्र मेहनत घेत होते.

याप्रसंगी हजारोंच्या जनसमुदायासह जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, महापालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.