Chikhali : दोन मुलांना घेऊन महिलेची विहिरीत उडी; एका मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चिखलीमधील एका महिलेने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 18) दुपारी सोनवणे वस्ती येथे उघडकीस आली. यामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

गौरव गणेश गाढवे (वय 7, रा. शिवकृपा कॉलनी, त्रिवेणी नगर, निगडी) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.  रुपाली गणेश गाढवे (वय 40), गंधर्व गणेश गाढवे (वय 5) यांना नागरिकांनी पाण्यातून बाहेर काढले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गाढवे या महिलेने आपल्या गौरव आणि गंधर्व या दोन चिमुरड्यांना घेऊन सोनवणे वस्ती, चिखली येथील एका विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिकांना याबाबत माहिती झाल्याने त्यांनी तात्काळ तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले.

या घटनेत गौरव या सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. तर रुपाली आणि गंधर्व यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिखली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.