Chikhali: जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती द्या; महापौरांच्या सूचना

Accelerate the work of water purification center; Mayor's instructions

एमपीसी न्यूज – चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला गती देण्यात यावी. मुदतीत काम पूर्ण करावे. पुढील वर्षी शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा होईल या दृष्टीने नियोजन करून काम करण्याच्या सूचना महापौर उषा ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यात येणार आहे. त्यानुसार पालिकेने नियोजन केले आहे. त्या अनुषंगाने चिखली येथे जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे.

पालिकेच्या वतीने चिखली,पाटीलनगर येथे उभारण्यात येत असलेल्या 300 एमएलडी क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची आज (शुक्रवारी) महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, डीआरए कन्संल्टन्सी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याबाबतची माहिती देताना सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, चिखली येथे 20 एकर जागेमध्ये 300 एमएलडी क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प 24 महिने कालावधीचा आहे. प्रकल्पाचे काँक्रीटीकरनाचे काम झाले आहे.

चिखली ते देहू बंधाऱ्यापर्यंत पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. त्याचे अंतर नऊ किलोमीटर आहे. या कामाला गती देण्यात यावी. दर महिन्याला या कामासंदर्भातील माहिती द्यावी. कामाच्या प्रगतीचा आढावा मांडावा, अशा सूचना ढाके यांनी दिल्या.

यावेळी या प्रकल्पाच्या 1400 एमएम व्यासाची पाईपलाईनच्या कामाची देखील पाहणी करण्यात आली. जलशुद्धीकरण प्रकल्प, पाईपलाईन आणि बंधाऱ्यातून पाण्याचा उपसा या गोष्टी समांतर सुरु राहण्याकरीता कामाचा वेग व नियोजन महत्वाचे आहे.

मुदतीत काम पुर्ण झाल्यास शहराला आज सुरु असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद होईल. पुढील वर्षी शहरवासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल. त्यादृष्टीने काम करण्याच्या सूचना महापौर ढोरे आणि सत्तारूढ पक्षनेते ढाके दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.