Chikhali : एटीएम फोडून दीड दिवस उलटल्यानंतरही बँक प्रशासन ढिम्म!; चोरलेल्या रकमेचा आकडाही अधिकाऱ्यांना कळेना

एमपीसी न्यूज – चिखली येथे अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड पळवली. ही घटना आज, सोमवारी (दि. 11) दुपारी उघडकीस आली. रविवारी पहाटे हा प्रकार घडला असून दीड दिवसानंतर देखील बँक अधिकाऱ्यांना याचा थांगपत्ताही लागला नाही. बँक प्रशासन अतिशय ढिम्म असून चोरून नेलेल्या रकमेचा आकडा अजूनही बँकेच्या अधिका-यांना मिळालेला नाही.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली मधील नेवाळे वस्ती येथे ॲक्सिस बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. एटीएम मधून लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. एटीएम फोडल्याची घटना दीड दिवसानंतर बँकेच्या निदर्शनास आली आहे. यामुळे चोरटे पसार झाले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यामाध्यमातून आरोपींची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.

 

मात्र, या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बँकेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा दाखल झाले. त्यामुळे पोलिसांना मशीनमधून किती रक्कम चोरीला गेली आहे, याबाबत माहिती मिळाली नाही. बँक कर्मचा-यांच्या ढिम्म कारभारामुळे गुन्हा दाखल करण्यात विलंब होत आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब होत असला तरी चिखली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.