Chikhali : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणावर हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून चौघांनी मिळून तरुणावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. 25) सायंकाळी ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.

प्रशांत गोकुळ खरात (वय 25, रा. मोरेवस्ती, चिखली) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश शिनगारे, रुपेश ठाकूर, रोहित जुजगर आणि दीनेश खरात (सर्व रा. भीमशक्‍तीनगर, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास फिर्यादी खरात हे ताम्हाणे वस्ती, चिखली येथील श्रीराम कॉलनीतून जात असताना चारही आरोपींनी त्यांना रस्त्यात अडविले. खरात यांच्याकडे आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, खरात यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी खरात यांना मारहाण करीत त्यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.