BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : पत्नीला मतदान प्रक्रियेचे काम सांगितल्यावरून पतीकडून बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण

दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मतदान प्रक्रियेचे काम अर्धवट राहिल्याने बूथ लेव्हल ऑफिसरने संबंधित कर्मचारी महिलेला फोन केला. फोन करून अर्धवट राहिलेल्या मतदान प्रक्रियेचे काम सांगितले. यावरून चिडलेल्या कर्मचारी महिलेच्या पतीने बूथ लेव्हल ऑफिसरला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 27) दुपारी एकच्या सुमारास तळवडे येथे घडली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

एकनाथ सोपानराव आंबवले (वय 45, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिल बाबू जाधव (वय 22), रिशा मल्लेश चव्हाण (वय 24, दोघे रा. वाल्हेकरवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंबवले हे तळवडे येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे बूथ लेव्हल ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. सीमा भिल्लो राठोड या सहयोगनगर येथे निवडणुकीसंदर्भात काम करतात. मतदारांना स्लिप वाटपाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती.

निवडणुक एक दिवसावर आली असून अर्ध्या स्लिप अद्याप वाटून झाल्या नाहीत. त्यात सीमा या गैरहजर होत्या. यामुळे बूथ लेव्हल ऑफिसर आंबवले यांनी त्यांना फोन केला. फोन केला त्यावेळी त्या रुग्णालयात होत्या. यावरून सीमा यांचा आरोपी पती अनिल याला फोन केल्याचा राग आला. त्याने फोनवरून आंबवले यांना शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी आंबवले यांच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ करत मारहाण केली. कार्यालयातील फुलदाणी आंबवले यांना फेकून मारली. यावरून आंबवले यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला. चिखली पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3