Chikhali : करणी करत असल्याच्या संशयावरून कारची तोडफोड

 पोलिसांनी केलं दोघांना अटक

एमपीसी न्यूज – करणी करत असल्याच्या संशयावरून भाऊ बहिणीने मिळून दाम्पत्याला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच कारच्या काचा फोडून नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 22) पहाटे साडेबारा वाजता राम मंदिर रोड, त्रिवेणीनगर येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

बाळू भगवान पडवळ (वय 48), मंगल भगवान पडवळ (वय 54, रा. राम मंदिर रोड, त्रिवेणीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत योगेश दिगंबर सपकाळ (वय 40, रा. राम मंदिर रोड, त्रिवेणीनगर) यांनी गुरुवारी (दि. 22) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सपकाळ यांनी आरोपींवर करणी केल्याचा आरोपींना संशय होता. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या कारच्या (एम एच 14 / सी एक्स 3189) काचा फोडून नुकसान केले.

तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावून जात ‘तुझ्या फॅमिलीला उभा चिरून टाकतो’ अशी धमकी दिली. आरोपी मंगल हिने फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून ‘तुला आता जिवंत सोडतच नाही’ अशी धमकी दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III