Chikhali: संतपीठामध्ये ‘सीबीएससी’ बोर्डाचा अभ्यासक्रम; संचालक मंडळाची स्थापना

उपसूचनेसह महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येणा-या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’मध्ये सीबीएससी बोर्डाचे अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने संचालक मंडळाची रचना जाहीर केली आहे. व्यवस्थापन समितीमध्ये शहरातील स्थानिक वारकरी, सांप्रादयातील ज्ञानी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा देखील अंतर्भाव करण्याची उपसूचना देत या प्रस्तावाला महासभेने आज (सोमवारी)मंजुरी दिली.

महापालिकेची जानेवारी महिन्याची तहकूब सभा आज (सोमवारी)पार पडली. महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वारसा असून शेजारीच श्री क्षेत्र आळंदी, देहू या तिर्थक्षेत्रांचे सानिध्यही लाभले आहे. त्यामुळे टाळगाव चिखली येथे राज्यातील पहिले ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ उभारण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे.

  • संतपीठ उभारणीसाठी येणार सुमारे 45 कोटी रुपये खर्च
  • या संतपीठ उभारणीला 13 मे 2015 रोजी महापालिका सभेत मान्यता देण्यात आल्यानंतर माध्यमिक शाळेसाठी आरक्षित चिखली येथील एक हेक्टर 80 गुंठे जागा महापालिकेला देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. या संतपीठामध्ये निवासी स्वरुपाचे, प्राथमिक शाळेपासून ते उच्चपदवीपर्यंतचे केवळ संतसाहित्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे. येथे वसतीगृह, सभागृह, अभ्यासवर्ग आदींचा समावेश असणार आहे. येथील शाळेमध्ये सर्वधर्मीय विद्यार्थ्यांना प्रवेश असून हे संतपीठ मराठी माध्यमातून शिक्षण देणारे असणार आहे. सुमारे 45 कोटी रुपये इतका खर्च या संतपीठ उभारणीसाठी येणार आहे. संत साहित्याचा वारसा नागरीकांना मिळावा, या उद्देशाने उभारण्यात येणा-या या संतपीठाच्या माध्यमातून भविष्यात सांप्रदाय आणि अध्यात्मिक तत्वज्ञानाचा प्रसार होणार आहे. त्यातूनच ‘संस्कृती जपणारे शहर’ असा उल्लेख महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात होणार आहे.

संत विचार, संस्कृती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी, संतपीठ कार्यरत करण्यासाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर कंपनी स्थापन करण्यात येत आहे. त्यादृष्टीने या भागातील मुलांना अध्यात्मिक आणि आधुनिक तंत्रज्ञानासह शिक्षण दिले जाणार असून त्यासाठी सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमांचा स्विकार करण्यात येणार आहे. तशी फेरबदल करण्याची तरतूद सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमातच आहे. सर्व सांप्रदाय आणि अध्यात्मिक तत्वज्ञानाचा अभ्यास यामध्ये असणार आहे. त्यासाठी सीबीएससी बोर्डाची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यातूनच संतपीठामध्ये मुलांचे शिक्षण सीबीएससी बोर्डाचे शिक्षण होणार आहे. त्यातूनच मुलांचा अध्यात्मिक पाया पक्का होवून उत्तम नागरीक घडला जाणार आहे. म्हणूनच अभ्यासक्रम ठरविताना ज्यामध्ये विविध विषयांचा अंतर्भाव केला जाणार आहे.

  • कंपनीमध्ये संचालक आणि सदस्यांची नियूक्ती करणे, कंपनी व्यवस्थापनासाठी मसुदा मान्य करण्यास संचालकांना अधिकार देणे, नवीन अधिकारी संचालक तसेच सदस्यांची डिजीटल सिग्नेचर आणि ओळख क्रमांक तयार करून घेणे, कंपनी स्थापनेनंतर अभ्यासक्रम निश्चित करणे, संचालक मंडळातर्फे सीबीएससी बोर्डाची मान्यता घेण्यास महासभेने मंजुरी दिली.

हे आहेत कंपनीवर संचालक!
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ या नावाने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्वावर कंपनी स्थापन करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांचे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. आयुक्त हर्डीकर हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत, तर पदसिद्ध संचालक आणि पदसिद्ध सचिव म्हणून महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे आणि प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे असणार आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी पराग मुंढे आणि कायदा विभागाचे प्रभारी कायदा सल्लागार चंद्रकांत इंदलकर हेही पदसिद्ध सदस्य असणार आहेत.

  • या व्यतिरिक्त संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे, हभप राजू महाराज ढोरे, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी तानाजी शिंदे आणि तज्ज्ञ सल्लागार स्वाती मुळे हे या कंपनीचे सदस्य असणार आहेत. मेसर्स के. जे. एल. अँड असोशिएट्सचे क्षितीज लुंकड कंपनीचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान, व्यवस्थापन समितीमध्ये शहरातील स्थानिक वारकरी, सांप्रादयातील ज्ञानी आणि ज्येष्ठ व्यक्तींचा देखील अंतर्भाव केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.