Chikhali : …….. असे केले पीएमपीेएमएलच्या वाहक महिलेने तीन चोरट्या महिलांना पोलिसांच्या हवाली

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या तत्पर वाहक महिलेने बसमध्ये प्रवासी महिलांच्या पर्स चोरी करणा-या तीन महिला चोरट्यांना पकडून दिले. याबद्दल पीएमपीएमएल प्रशासनाकडून त्या वाहक महिलेचे कौतुक होत आहे. बस चालकाने देखील त्यांना चांगल्या प्रकारे मदत केली आहे. या कामगिरीमुळे बस प्रवासात चो-या करणा-या चोरट्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.

माधवी लांडगे असे तत्पर वाहक महिलेचे नाव आहे. माधवी मागील दीड वर्षांपासून पीएमपीएमएलच्या सेवेत कार्यरत आहेत. शुक्रवारी (दि. 7) माधवी आळंदी-देहू या मार्गावरील बस क्रमांक 309 या बसवर वाहक म्हणून कार्यरत होत्या. तर माधवनाथ पवार हे त्या बसचे चालक होते. सकाळपासून दोन फे-या झाल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता तिसरी फेरी सुरु झाली. बस बो-हाडेवाडी येथे आली. बो-हाडेवाडीच्या बस स्टॉपवरून तीन महिला बसमध्ये बसल्या. त्या महिलांच्या कडेवर लहान मुले होती.

याच बसमधून शैला अय्यंगार देखील प्रवास करत होत्या. बस बो-हाडेवाडी बस स्टॉपच्या पुढे गेली असता बसमध्ये अचानक गोंधळ सुरु झाला. प्रवासी महिला अय्यंगार मोठमोठ्याने आरडाओरडा करत होत्या. बो-हाडेवाडी येथून बसमध्ये बसलेल्या तीन महिलांवर त्या चोरीचा आरोप करत होत्या. वाहक माधवी यांनी या प्रकरणात लक्ष घातले. माधवी याबाबत विचारत असताना तीन महिलांपैकी एका महिलेने तिच्या हातातील पैसे नकळत बसमध्ये खाली टाकले. त्यानंतरही त्या महिला आपण निर्दोष असल्याचे सांगत होत्या.

माधवी यांनी हा प्रकार पोलिसांना बोलावून त्यांच्यासमोर याचा निवडा करण्याचे सांगितले. त्यावर लगेच तिन्ही महिला गयावया करून आमचं चुकलं, कुणाला काही सांगू नका म्हणून विनवणी करू लागल्या. माधवी यांनी बसची दोन्ही दारे बंद केली आणि चालक पवार यांना बस पोलीस चौकीत घेण्यास सांगितले. बराच वेळ पोलीस चौकी न सापडल्याने शेवटी चालक पवार यांनी बस चिखली येथील मुख्य चौकात बस थांबवली. तिथे माधवी यांनी स्थानक प्रमुख बंडू भालेकर आणि नितीन पळसकर यांना हा प्रकार सांगितला. तसेच चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या मदतीने तिन्ही महिलांना चिखली पोलिसांच्या हवाली केले.

पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांनी पीएमपीएमएल बसमध्ये होणारे चोरीचे प्रकार रोखण्यासाठी ‘चोरट्यांना पकडा आणि पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळवा’ या योजनेची घोषणा केली होती. माधवी लांडगे यांनी प्रसंगावधान दाखवून तत्परतेने चोरट्या महिलेनं पकडून दिले आहे. त्यामुळे त्यांना हे पाच हजार रुपयांचे बक्षीस देखील मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

माधवी लांडगे म्हणाल्या, “पीएमपीएमएल बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी सतर्क राहायला हवे. अनुचित प्रकार आढळून आल्यास वाहक आणि चालक यांना सांगायला हवा. वाहक आणि चालकांनी देखील त्यावर योग्य खबरदारी घ्यायला हवी. वरिष्ठ वेळोवेळी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सूचना देत असतात, त्याचे पालन मी केले आहे. बसमध्ये चोरी करणा-या महिलांच्या कडेवर लहान मुलं होती. त्यामुळे प्रथमदर्शनी त्या महिला चोर असतील असा विश्वास बसणार नव्हता. पण त्यांना पोलिसांना बोलावून या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगताच त्यांनी चोरी केल्याचे मान्य केले.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.