Chikhali : खेड दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना केली चिखली पोलिसांनी अटक

या आरोपींनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. : Chikhali police arrest two accused in Khed double murder

एमपीसी न्यूज – खेड येथे झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींना चिखली पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी त्यांच्या साथीदारासोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सुरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन हौसिंग सोसायटी, घरकुल -चिखली), किरण चंद्रकांत बेळामगी (रा. निलरत्न हाऊसिंग सोसायटी, घरकुल -चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक चेतन सावंत व पोलीस शिपाई संतोष सपकाळ यांना माहिती मिळाली की, खेड पोलीस ठाण्यात 8 ऑगस्ट रोजी दाखल असलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी फरार आहेत. ते आरोपी चिंचवडगाव येथील बस स्टॉपवर येणार आहेत.

त्यानुसार पोलिसांनी चिंचवडगाव बस स्टॉप परिसरात सापळा लावून सुरज आणि किरण या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता सुरज आणि किरण या दोघांनी त्यांच्या अन्य साथीदारांसोबत मिळून दुहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली.

त्यावरून दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त सजंय नाईक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर, चेतन सावंत, विपुल होले, बाबा गर्जे, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांच्या पथकाने केली आहे.

काय आहे खेड तालुक्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरण –

खेड पोलीस ठाण्यात 8 ऑगस्ट रोजी दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मंगेश गुलाब सावंत (वय 35, रा. शिरोली, पाईटरोड, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

8 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता फिर्यादी मंगेश यांना त्यांच्या एका मित्राने फोन करुन सांगितले की, शिरोली गावाच्या हद्दीत खापरदरा हरण टेकडी डोंगरावर एका लिंबाच्या झाडा जवळ दोन मुलांना मारुन टाकलेले आहे.

त्यानुसार मंगेश यांनी तिथे जाऊन बघितले असता 28 ते 30 वयोगटातील मुलांची प्रेत पडलेली दिसली. दोघांच्या चेह-यावर, हातावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले होते.

त्यातील एकाची डोक्याची कवटी फुटून गेली होती. सुमारे 15 फुटाच्या अंतरावर दोघांचे मृतदेह पडले होते. मंगेश यांनी तात्काळ खेड पोलिसांना माहिती दिली आणि गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.