Chikhali Crime : टपरीसमोर भांडण करू नका म्हटल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – टपरीसमोर भांडण करू नका म्हटल्याने सहा जणांनी मिळून टपरी चालक तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री साडेनऊ वाजता कृष्णानगर भाजी मंडई चौक, घडली.

धम्मपाल माणिक पालके (वय 20, रा. मोरेवस्ती, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत बुधवारी (दि. 25) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील गावडे, श्रेयस शेतसंदी, दादा शेंडगे, पुनीत जोगीन, अनिल गावडे, सचिन ढगे (सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पालके यांची कृष्णानगर भाजी मंडई चौकात टपरी आहे. मंगळवारी रात्री आरोपी एका कारमधून पालके यांच्या टपरीसमोर आले. त्यानंतर दोन दुचाकीवरून आणखी चार ते पाचजण तिथे आले. त्यांच्यामध्ये भांडण सुरु झाले. त्यामुळे पालके यांनी ‘माझ्या टपरीसमोर भांडण करू नका, पुढे जा’ असे म्हटले.

कारमधून आलेले आरोपी आणि दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींमध्ये वाद झाल्यानंतर कारमधून आलेले आरोपी पालके यांच्याकडे आले. ‘तू आमच्या भांडणात का पडला’ असे म्हणून त्यांना फायबर पाईपने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.