Chikhali: गुटखा विक्री आणि खरेदी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

आरोपी विनोद हा नॅनो कारमधून विक्रीसाठी गुटखा घेऊन जात होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी जाधववाडी येथील मधला पेठा येथे रस्त्यावर सापळा रचून विनोदला ताब्यात घेतले.

एमपीसी न्यूज – गुटखा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्याची वाहतूक करणा-या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह अन्य चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिसांनी जाधववाडी, चिखली येथे शनिवारी (दि. 25) केली.

विनोद चुनीलाल गुर्जर (वय 23, रा. जाधववाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह धनराज चौधर, नितीन छाजेड, महेंद्र राठोड, शाकीब (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार आर डी बोरसे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद हा नॅनो कारमधून (एमएच 12 जेसी 1478) विक्रीसाठी गुटखा घेऊन जात होता. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी जाधववाडी येथील मधला पेठा येथे रस्त्यावर सापळा रचून विनोद याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून विमल पान मसाला (लाल), विमल पान मसाला (निळा), विमल पान मसाला (हिरवा), राज निवास पान मसाला, महक पान मसाला, हॉट पान मसाला, मिराज पानमसाला, आरएमडी पान मसाला, तंबाखू गाय छाप असा एकूण 1 लाख 79 हजार 158 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

विनोद याच्याकडे सापडलेल्या गुटखाबाबत चौकशी केली असता त्याने हा माल अन्य आरोपींकडून खरेदी केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी विनोद याला अटक करत एकूण पाच जणांवर भारतीय दंड विधान कलम 272, 273, 328, अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.