Chikhali Crime News : शाळेच्या आयटी कन्सल्टंटला मारहाण प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी आलेल्या पालकांनी शाळेच्या आयटी कन्सल्टंटला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. याबाबत 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास त्रिवेणीनगर येथील सेंट अ‍ॅन्स स्कुल येथे घडली.

स्टॅफिन फ्रॅन्सिस चेरुवतुर (वय 40, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 25) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावसाहेब चंद्रकांत थोरात, गणेश सामल, शाळेतील इयत्ता दहावीच्या वर्गातील चार ते पाच विद्यार्थ्यांचे पालक, रावसाहेब थोरात याचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेची फी न भरलेल्या काही विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी त्रिवेणीनगर येथील सेंट अ‍ॅन्स स्कुल येथे आले. दरम्यान संबंधित पालकांनी शिक्षणाधिकारी, पालिका अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता. त्यावर प्रशासनाने संबंधित पालकांना दाखला न देता मार्कलिस्ट देण्यासाठी सांगितले होते.

पालकांनी शाळेच्या गेटवर गैरकायद्याची मंडळी जमवून शाळेच्या गेटमधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. फिर्यादी हे शाळेत आयटी कन्सल्टंट आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यातील एकाने घटनेचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करत फिर्यादी यांची बदनामी केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.