Chikhali Crime News : सोन्याचे ब्रेसलेट, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी आणि 20 लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून सोन्याचे ब्रेसलेट, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी आणि घराच्या बांधकामासाठी 20 लाख रुपये आणण्याची सासरच्या लोकांनी विवाहितेकडे मागणी केली. त्यावरून विवाहितेचा छळ केला. हा प्रकार 24 ऑगस्ट 2020 पासून 23 ऑगस्ट 2021 या कालावधीत कदमवाक वस्ती, लोणी काळभोर येथे घडला.

याप्रकरणी पीडित विवाहितेने गुरुवारी (दि. 26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद संजय मोहिते, संजय चंद्रसेन मोहिते, अमोल संजय मोहिते आणि दोन महिला (सर्व रा. लोणी काळभोर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादीच्या विवाहामध्ये त्यांचा मानपान केला नाही. तसेच माहेरहून पतीसाठी सोन्याचे ब्रेसलेट, वॉशिंग मशीन, गॅस शेगडी आणि घराचे बांधकाम करण्यासाठी 20 लाख रुपये आणण्याची मागणी केली. ते विवाहितेने आणले नाहीत या कारणावरून तिला शिवीगाळ आणि मारहाण केली.

विवाहितेच्या वडिलांचा आरोपींनी अपमान करत त्यांना शिवीगाळ केली. विवाहितेला हीन दर्जाची वागणूक दिली. विवाहामध्ये फिर्यादी यांच्या वडिलांनी दिलेले स्त्रीधन आरोपींनी काढून घेऊन त्याचा अपहार करून फिर्यादी यांना घरातून हाकलून दिले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.