Chikhali Crime News : अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी दीड वाजता भांगरे कॉलनी येथील एका किराणा दुकानासमोर आणि दुपारी अडीच वाजता बग वस्ती, चिखली येथे घडली.

प्रतिक दादा चव्हाण (वय 17, रा. भांगरे कॉलनी, पाटीलनगर, चिखली) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र रविवारी दुपारी दीड वाजता गौरव मोरे भांगरे कॉलनी येथील एका किराणा दुकानासमोर थांबले होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यावेळी फिर्यादी यांनी एका अल्पवयीन मुलाला विचारले की, ‘तू इतर मुलांना माझ्याबद्दल वाईट का सांगतो. मला माझ्या पाठीमागे शिव्या का देतो’ त्यावरून दोन मुलांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. फिर्यादी यांचा मित्र गौरव मोरे भांडण सोडविण्यासाठी आला. त्या भांडणात मारहाण करणा-या मुलाचा मोबाईल पडला. तो फोन गौरव याने घेतला.

त्यानंतर दुपारी अडीच वाजता फिर्यादी त्यांचा मित्र गौरव मोरे, प्रशांत भुसारी, अंबादास राठोड यांच्यासोबत बग वस्ती मधील दत्तात्रय बग यांच्या विहिरीजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी सहा अल्पवयीन मुले तिथे आली. त्यांनी गौरव मोरेकडे मोबाईल मागितला. त्यावरून त्यांनी गौरव याला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आले असता आरोपींनी कोयत्याने फिर्यादी यांच्यावर वार करून जखमी केले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.