Chikhali Crime News : ‘मी तुमच्या घरी पूजा केली तर तुमची खूप प्रगती होईल’ असे म्हणून जादूटोणा करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी एका जादूटोणा करणा-या मांत्रिकाला अटक केली आहे. ‘मी तुमच्या घरी पूजा केली तर तुमची खूप प्रगती होईल’ असे सांगून त्याने एका व्यक्तीच्या घरी पूजा घालण्याचा प्रयत्न केला होता. पूजेचे साहित्य घेऊन येत असताना पोलिसांनी माग काढून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या.

गौतम पंढरीनाथ मोरे (वय 40, रा. कुदळवाडी, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई संतोष बांगर यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस शिपाई बांगर यांना रविवारी (दि. 7) पहाटे तीन वाजता कुदळवाडी येथील एका पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती काळे गाठोडे घेऊन संशयितरित्या जाताना दिसला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले आणि त्याच्याकडे असलेल्या गाठोड्याबाबत चौकशी केली.

त्याच्या जवळील गाठोड्यात जादूटोणा करण्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य, एक चाकू आणि मोबाईल फोन मिळाला. ‘हे पूजेचे साहित्य घेऊन आपण गोविंद खंडू मोरे यांच्याकडे जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी गोविंद मोरे यांच्याकडे विचारपूस केली असता ‘आरोपी गौतम मोरे हा जादूटोणा करण्यासाठी पूजा करत असल्याचे सांगितले. ‘मी तुमच्या घरी पूजा केली तर तुमची खूप प्रगती होईल, असे त्याने मला सांगितले होते’ असेही गोविंद मोरे यांनी पोलिसांना सांगितले.

त्यावरून पोलिसांनी गौतम मोरे याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कायदा 2013चे कलम 3(2) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.