Chikhali Crime News : आजारपणाला कंटाळून ज्येष्ठाची तर विद्यार्थी तरुणाची टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील घरकुल येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थी असलेल्या तरुणाने आणि एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. यातील पहिली घटना रविवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास तर दुसरी घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. ज्येष्ठाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. तर तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

रवीकुमार अलाप्पा बलीजा (वय 20, रा. इमारत क्रमांक एफ 21, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयीन विद्यार्थी असलेला रवीकुमार बलीजा हा घरकुल येथे त्याच्या कुटुंबियांसोबत राहण्यास आहे. तो रहात असलेली इमारत सात मजल्यांची असून, त्या इमारतीच्या टेरेसवर काही जण नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जातात. त्यानुसार रवीकुमार हा रविवारी सायंकाळी इमारतीच्या टेरेसवर व्यायामासाठी गेला.

त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास त्याने टेरेसवरून उडी मारली. त्याच्या घरच्यांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आत्महत्येची दुसरी घटना घरकुल येथील इमारत क्रमांक ए 16 येथे घडली. रोहिदास रावजी पिंगळे (वय 61, रा. इमारत क्रमांक बी 8, घरकुल), असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पिंगळे यांच्यावर मानसोपचार सुरू होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना आजार होता. मुलगा, सून व पत्नी यांच्यासह ते घरकुल येथे रहात होते. रोहिदास यांचा मुलगा सोमवारी मॉर्निंग वॉकवरून आल्यानंतर वडील रोहिदास घरात दिसून आले नाहीत म्हणून त्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत.

त्यानंतर मुलगा कामावर निघून गेला. त्यानंतर रोहिदास यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास घरकुल येथील ए 16 क्रमांकाच्या इमारतीवरून उडी मारली. तेथील काही जणांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांचा मुलगा कामावरून परत आला. रोहिदास यांना पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

मृत रोहिदास यांच्या खिशात त्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.