Chikhali Crime News : चिखलीत सापडलेली तीनशे वर्षांपूर्वीची 216 सोन्याची नाणी पुरातत्व विभागाकडे सुपूर्त

एमपीसी न्यूज – बांधकामाचा पाया खोदताना सापडलेली ऐतिहासिक नाणी बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवली. तसेच या विषयी पुरातत्व विभागाला माहिती दिली नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कारवाई करून 300 वर्षांपूर्वीची 216 सोन्याची नाणी आणि 525 ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या हस्तगत केला आहे. ही नाणी आणि तांब्या पोलिसांनी पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केला.

चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक बाबालाल तांबोळी यांना माहिती मिळाली की, नेहरूनगर येथे राहणा-या सद्दाम सालार खां पठाण याच्याकडे इतिहासकालीन सोन्याची नाणी आहेत. ती त्याने बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवली आहेत. त्यानुसार पोलिसांनी नेहरूनगर येथे संबंधीत व्यक्तीच्या घरात छापा मारला.

पठाण याचे सासरे आणि मेहुणा गावाहून कामानिमित्त पिंपरीत आले होते. पठाण याने एका मध्यस्थी व्यक्तीच्या मदतीने त्या दोघांना चिखली येथील एका बांधकामाचा पाया खोदण्याच्या कामावर लावले होते. पाया खोदत असताना त्यांना पाच ते सहा जुनी सोन्याची नाणी आढळली.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर दुस-या दिवशी त्यांनी तिथल्या मातीच्या ढिगा-यात शोध घेऊन 525 ग्रॅम वजनाचा कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्या आणि त्यात असलेली 216 सोन्याची नाणी शोधली. ती नाणी त्यांनी कुणालाही न सांगता स्वतःकडे ठेवली.

खोदकामात सापडलेली इतिहासकालीन नाणी सन 1720 ते 1750 या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहमद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश कदम, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार केराप्पा माने, दिलीप चौधरी, शिवानंद स्वामी, प्रमोद वेताळ, दीपक खरात, उषा दळे, जयवंत राऊत, वसंत खोमणे, विपुल जाधव, जमीर तांबोळी, नामदेव राऊत, अजित सानप, नामदेव कापसे, आतिष कुडके, शिवाजी मुंढे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.