Chikhali Crime News : तोतया सहाय्यक पोलीस आयुक्ताला अटक; बनावट ओळखपत्राद्वारे द्यायचा ‘हूल’

एमपीसी न्यूज – सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून मागील अनेक दिवसांपासून पोलीस आणि टोल नाक्यावरील कर्मचा-यांना हूल दाखवून शासनाची फसवणूक करणा-या तोतया ‘एसीपी’ला चिखली पोलिसांनी बेड्या ठोकलया. त्याने मंगळवारी पिंपरी-चिंचवड शहरातील एका वाहतूक पोलिसाला ‘हूल’ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहतूक पोलिसाने सतर्कता दाखवत त्याची पोलखोल केली.

प्रवीण लक्ष्मण सूर्यवंशी (वय 33, रा. मल्हारपेठ, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या तोतया एसीपीचे नाव आहे. याबाबत वाहतूक पोलीस नाईक सुनील गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी गायकवाड हे निगडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. ते मंगळवारी सायंकाळी स्पाईन रोड चिखली येथे जाधव सरकार चौकात कर्तव्य बजावत होते. वाहतुकीचे नियम न पाळणा-या तसेच विनामास्क वाहन चालकांवर कारवाई करत होते.

_MPC_DIR_MPU_II

सायंकाळी साडेपाच वाजता होंडा झॅज कार (एम एच 50 / एल 2216) जाधव सरकार चौकातून जात होती. कारमधील दोघेही विनामास्क प्रवास करत होते. त्यामुळे पोलीस नाईक गायकवाड यांनी कार थांबवली. चालकाकडे चौकशी करत असताना त्याच्या शेजारी बसलेल्या आरोपी प्रवीण याने तो स्वतः एसीपी असून अंधेरी वेस्ट, मुंबई येथे कार्यरत असल्याचे सांगितले.

पोलीस नाईक गायकवाड यांनी त्याला ओळखपत्र मागितले. ओळखपत्रात असलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर राजमुद्रा आणि स्टार असल्याचे दिसल्याने गायकवाड यांना शंका आली. त्यांनी तोतया एसीपीला कुदळवाडी पोलीस चौकीत नेले. तिथे पोलिसांनी चौकशी केली असता ते ओळखपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले.

हा प्रकार आरोपी प्रवीण याने मान्य केला. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तोतया एसीपीला बेड्या ठोकल्या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (वाहतूक) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) श्रीकांत डिसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. एस. राऊत, पोलीस नाईक सुनील गायकवाड, दहिफळे, कशाळे, कोल्हे यांच्या पथकाने केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन देशमुख तपास करीत आहेत.

या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस नाईक गायकवाड यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.