Chikhali Crime News : चिखलीत दोन, हिंजवडीत एक घरफोडी; एका बैलासह पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – चिखली परिसरात दोन तर हिंजवडी परिसरात एक घरफोडीची घटना घडली आहे. चिखलीतील घटनेत रोख रक्कम, किराणा माल, सोन्या-चांदीचे दागिने तर हिंजवडी परिसरातून दोन चोरट्यांनी एक बैल चोरून नेला. याप्रकरणी शनिवारी (दि. 18) चिखली आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल पहिल्या प्रकरणात शेराराम परकाजी चौधरी (वय 52, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कृष्णानगर, चिंचवड येथे राजेश ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी (दि. 17) सकाळी दहा ते शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे लोखंडी ग्रीलचे दोन कुलूप कापून आत प्रवेश केला. दुकानातून दहा हजार रुपये रोख रक्कम आणि किराणा साहित्य असा एकूण चार लाख 42 हजार 316 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुस-या प्रकरणात प्रणव बाळासाहेब जाधव (वय 33, रा. चिखली प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून नऊ ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण 50 हजारांचा माल चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दीपक तुकाराम सोरटे (वय 35, रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार कैलास पांडुरंग भोकसे, आनंदा पांडुरंग भोकसे (दोघे रा. कुरकुंडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोरटे यांनी त्यांचा अडीच वर्षे वयाचा 25 हजार रुपये किमतीचा बैल संत तुकाराम साखर कारखाना कासारसाई येथे गुरांच्या गोठ्यात बांधला होता. 25 ऑगस्ट रोजी रात्री दहा ते 26 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या कालावधीत आरोपींनी गोठ्यातून फिर्यादी यांचा बैल चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.