Chikhali Crime News : आठ दिवसांचा पगार न दिल्याने कामगाराने कंपनीच्या दोन कार फोडल्या

एमपीसी न्यूज -आठ दिवसांचा पगार न दिल्याने एका 55 वर्षीय कामगाराने कंपनीसमोर पार्क केलेल्या दोन कारच्या काचा फोडल्या. याबाबत कामगाराला अडवण्याचा प्रयत्न केला असता कामगाराने अडविणाऱ्यांच्या दिशेने दगड फेकून मारले.

ही घटना मंगळवारी (दि.15) सकाळी दहा वाजताच्या सुमारास अथर्व क्रेन अँड व्हाईस, चिखली येथे घडली.

रामदास रंगनाथ वाघले (वय 55, रा. आदर्शनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत श्रीनिवास त्रिंबक साठे (वय 79, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामदास याने फिर्यादी साठे यांच्या कंपनीत आठ दिवस काम केले आहे. त्याचा पगार देण्याची आरोपीने मागणी केली. त्यावर फिर्यादी यांनी त्याला ‘कंपनीतील कोणत्याच कामगाराचा पगार झाला नाही. त्यांचे पगार झाले कि मी तुमचा पगार तुम्हाला देतो’ असे समजावून सांगितले.

त्यावरून चिडलेल्या कामगार आरोपीने कंपनीच्या समोर पार्क केलेल्या कंपनीच्या दोन कारच्या काचा फोडून नुकसान केले. फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता आरोपीने त्यांच्या दिशेने दगड फेकून मारले. त्यात फिर्यादी यांच्या मनगटाला दुखापत झाली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.