Chikhali: पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पिस्तुलासह अटक; खंडणी दरोडा विरोधी पथकाची कारवाई

Chikhali: Criminal on police record arrested with pistol; Action of anti-ransom robbery squad

एमपीसी न्यूज- पोलीस रेकॉर्डवरील आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

अमोल बसवराज वाले (वय 22, रा. इंदिरानगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर आणि त्यांचे पोलीस कर्मचारी चिखली परिसरात रस्त्यावर होणाऱ्या चोरीच्या आणि सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांच्या अनुषंगाने गस्त घालत होते.

गस्त घालत असताना पोलीस शिपाई किरण काटकर यांना माहिती मिळाली की, कृष्णानगर चिखली येथे नवनाथ रसवंती गृहासमोर एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्टलसारखे शस्त्र आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णानगरकडे धाव घेतली.

परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी अमोल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस असा एकूण 40 हजार 200 रुपयांचा ऐवज सापडला.

पोलिसांनी हा ऐवज जप्त करून आरोपी अमोल याला अटक केली.

अमोल याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अमोल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

त्याच्यावर 2018 साली निगडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा एक आणि भोसरी पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, अशोक दुधवणे, नितीन लोखंडे, आशिष बोटके, किरण काटकर, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.