BNR-HDR-TOP-Mobile

Chikhali : संत पीठावर स्थानिक सांप्रदायिक क्षेत्रातील चार प्रतिनिधींना संधी द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंदा यादव यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’च्या संचालक मंडळावर गावातील सांप्रदायिक क्षेत्रातील चार प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे अध्यक्ष आनंदा यादव यांनी महापालिकेकडे केली आहे.

भागवत धर्माचा प्रसार व प्रचार व्हावा अन् वारकरी सांप्रदायाचे पारंपारीक शिक्षण जनमाणसांना मिळावे, या उद्देशाने हे ‘संतपीठ’ उभारण्यात येत आहे. टाळगाव चिखलीला सांप्रदायिक वसा आणि वारसा आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी वैकुंठ गमन केले. त्यावेळेस त्यांच्या हातातील टाळ चिखलीगावात पडले होते, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या गावाला टाळगाव चिखली असे नाव पडले आहे. चिखली गावाची टाळगाव चिखली या नावाने गावाची दिंडी महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर रथाच्या मागे चालते. देहूपासून पंढरपूरपर्यंत 300 भावीक पायी चालतात.

चिखली गावामध्ये टाळासाठी भव्य मंदिर आहे. एकादशीला मंदिरात कीर्तन होते. आळंदीहून दिंड्या टाळाचे दर्शन घेऊन जातात. अनेक दिंड्या व वारकरी टाळ मंदिरात ये-जा करीत असतात. असा संप्रदायाचा वसा आणि वारसा असलेल्या टाळगाव चिखलीमध्ये संतपीठ होत आहे. त्याचा आम्हाला अभिमान असून संतपीठावर गावातील सांप्रदायिक क्षेत्रातील चार जणांना संधी देण्याची मागणी यादव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. तसेच याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

.