Chikhali : साने चौकाजवळ विद्युत डीपीला आग; कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – चिखली मधील साने चौकाजवळ असलेल्या एका विद्युत डीपीला आग लागली. ही घटना रविवारी (दि. 3) पहाटे घडली असून सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्थानिक नागरिक अजय कसबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साने चौक ते म्हेत्रे चौक या मार्गावर असलेल्या महादेव मंदिराजवळ विद्युत डीपी आहे. या डीपीला पहाटे अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. तसेच एक मोठा आवाज देखील झाला. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत डीपीच्या आजूबाजूला असलेल्या झोपड्यांमधील नागरिकांना बाहेर काढले.

दरम्यान, अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ वीजपुरवठा खंडित करून आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.