Chikhali : दरोड्याच्या तयारीत असलेली पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकीसह दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 1 लाख 6 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) पहाटे पूर्णानगर चिखली येथे करण्यात आली.

पूर्णानगर चिखली येथे पाच संशयित मुले जमली आहेत. ते श्रीदत्त मोबाईल शॉपी या दुकानावर दरोडा टाकणार आहेत. अशी माहिती चिखली पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास पूर्णानगर येथे जाऊन सापळा रचून पाच मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून होंडा अॅक्टिव्हा (एम एच 14 / जी डब्ल्यू 4085), होंडा शाईन (एम एच 14 / डी बी 7652), हिरो होंडा (एमएच 14 / यु 3292) या तीन मोटारसायकल, त्याचबरोबर एक लोखंडी कोयता, कटावणी, लोखंडी रॉड, स्क्रू ड्रायवर, नायलॉनची रस्सी, पेनरिलीफ स्प्रे, पाच मंकी मास्क, सॅग बॅग असा एकूण 1 लाख 6 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला.

  • जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल चोरीच्या असून एक मोटारसायकल पिंपरी आणि दोन मोटारसायकल चिंचवड पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आहेत. यामुळे चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

चिखली पोलिसांनी आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल फोन जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 1 लाख 20 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.