Chikhali : Idea कंपनीतून बोलत असल्याचा बहाणा करून एकाची साडेतेरा लाखांची फसवणूक
Fourteen lakh fraud under the pretext of speaking from Idea company

एमपीसी न्यूज – आयडिया कंपनीतून बोलत असल्याचे सांगून सीम कार्ड थ्री जी मधून फोर जी मध्ये कन्व्हर्ट करण्यास सांगून व्यक्तीचे सिमकार्ड बंद केले. त्यानंतर त्या सीम क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले.
कर्जाची रक्कम आणि बँक खात्यातील शिल्लक रक्कम असे एकूण 13 लाख 42 हजार 499 रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवून व्यक्तीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 6 ते 7 मे 2020 या कालावधीत स्पाईन रोड, चिकली प्राधिकरण येथे घडला आहे.
दीपक साहेबराव सूर्यवंशी (वय 47, रा. स्पाइन रोड, चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी 25 जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7904981441 या मोबईल क्रमांक धारकावर गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 मे रोजी सकाळी पावणे बारा वाजता फिर्यादी दीपक यांना 7904981441 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्ती हिंदी भाषेत बोलत होती. ‘मी आयडिया कंपनी, नोएडा येथून बोलत आहे. तुम्ही वापरत असलेले सीमकार्ड हे थ्री जी आहे. ते फोर जी मध्ये अपडेट करावे लागेल. जर अपडेट केले नाही तर तुमचे सिमकार्ड बंद होईल’ असे फोनवरील व्यक्तीने दीपक यांना सांगितले.
त्यानंतर दीपक यांच्याकडून अधिक माहिती घेऊन त्यांच्या मोबाइलवर 8991210000053037782 हा नंबर पाठवला. आरोपीने पाठवलेला नंबर दीपक यांना आयडिया कंपनीच्या सर्व्हिस क्रमांक 12345 यावर पाठवण्यास सांगितले. त्यानुसार दीपक यांनी कंपनीत सर्व्हिस क्रमांकावर आरोपीने दिलेला नंबर पाठवला.
कंपनीकडून दीपक यांना मेसेजद्वारे सिमकार्ड अपडेट करण्यासाठी संमती विचारण्यात आली. दीपक यांनी त्याला संमती दिली आणि आरोपीच्या सांगण्यानुसार पुन्हा तो मेसेज कंपनीच्या सर्विस क्रमाकावर पाठवला.
दीपक यांना कंपनीकडून ‘तुमचे सिमकार्ड 6 मे रोजी डिअॅक्टिव्हेट होईल आणि 7 मे रोजी दुपारी तीन वाजता सुरु होईल, असे सांगितले. परंतु 7 मे रोजी सिमकार्ड सुरु झाले नाही. त्यामुळे दीपक यांनी आरोपीच्या मोबईलवर संपर्क केला.
‘तुमचेच काम सुरु आहे. एक तासात मोबाइल फोन सुरु होईल’ असे सांगितले. दीपक यांचा मोबाइल फोन क्रमांक त्यांच्या बँक खात्याला कनेक्ट आहे. त्यांना शंका आल्याने त्यांनी बँक खाते ऑनलाईन उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे बँक खाते उघडले नाही.
दीपक यांनी तत्काळ बँकेच्या कस्टमर केअरला संपर्क करून बँक खाते बंद करण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, त्यांच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. बँकेच्या खात्यात सध्या तीन लाख 43 हजार रुपये शिल्लक असल्याचेही कस्टमर केअरकडून दीपक यांना समजले.
दीपक यांनी बँक खाते बंद केले. दरम्यान आयडिया कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून संपर्क केलेल्या व्यक्तीने दीपक यांच्या बँक खात्यावर प्री अप्रुव्ह पर्सनल लोन म्हणून 10 लाख 41 हजार 238 रुपये मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम आणि दीपक यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम अशी एकूण 13 लाख 42 हजार 499 रुपयांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर ट्रान्सफर देखील केली.
याबाबत दीपक यांनी 7904981441 या मोबाइल धारकावर भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000चे कलम 66 (ड) नुसार गुन्हा नोंदवला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.