Chikhali News: घरकुलची पुन्हा तपासणी, 1242 पैकी 721 सदनिका बंद तर 83 सदनिकांमध्ये भाडेकरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे विकसित करण्यात आलेल्या आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या घरकूल योजनेतील यापूर्वी बंद आढळलेल्या 1242 सदनिकांचे पुन्हा आज (शनिवारी) सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 721 सदनिका बंद तर 83 सदनिकांमध्ये भाडेकरू आढळून आल्याची माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या पथकाला बंद सदनिकांची पुन्हा तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह वीस कर्मचारी यांनी ही पुन्हा तपासणी केली. यापूर्वी 4 सप्टेंबर रोजी सर्व सदनिकांची तपासणी केली होती. त्यामध्ये 1242 सदनिका बंद आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी आज केली. त्यामध्ये 721 सदनिका पुन्हा बंद तर 83 सदनिकांमध्ये भाडेकरू राहत असल्याचे आढळून आले.

438 सदनिकांमध्ये सदनिकाधारक स्व:त राहत असल्याचे आढळून आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. या योजनेतील लाभार्थ्यांना 10 वर्षापर्यंत सदनिका भाड्याने देता येत नाही, तसेच विक्री करता येत नाही. लाभधारकांच्या समवेत झालेल्या करारनाम्यात या सदनिकांचा वापर स्व:त राहण्यासाठी करावयाचा असल्याचे नमूद आहे. या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांचा लाभ रद्द करण्याची तरतूद असून त्याबाबत संबंधितांना नोटीस देण्याचे निर्देश झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना दिल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.