Chikhali : कुदळवाडी येथे भंगाराची चार गोडाऊन भीषण आगीत भस्मसात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- चिखली कुदळवाडी येथे भंगाराच्या गोडाऊनला आज पहाटे 5 वाजता आग लागून चार गोडाऊन जळून खाक झाली. या आगीमध्ये भंगाराचे साहित्य, लाकूडफाटा तसेच केमिकल साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीची तीव्रता भयानक असल्यामुळे घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रातून तीन वाहने तसेच प्राधिकरण, भोसरी, तळवडे, चिखली अग्निशमन केंद्रातून प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी रवाना झाली. त्याचप्रमाणे टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एमआयडीसी चाकण, फोर्स मोटर्स, सेंच्युरी एन्का, जय हिंद इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार मनोज मोरे आणि निकेश मोरे यांची 4 गोडाऊन जाळून खाक झाली. सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. चार तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी चार मोठे तसेच आजूबाजूचे काही गोडाऊन भस्मसात झाले असून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.