Chikhali : प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला; पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून सकाळच्या वेळी प्रातर्विधीसाठी जात असलेल्या पत्नीवर पतीने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 17) सकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी चिखली येथे घडली.

प्रदीप माधव आंबटवार (वय 25, रा. आलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माधव गोविंद आंबटवार (वय 50) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुणाबाई आंबटवार असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला आणि आरोपी हे फिर्यादी प्रदीप यांचे आई-वडील आहेत. आरोपी माधव याला दारूचे व्यसन आहे. तो काहीही काम करत नाही. यावरून अरुणाबाई आणि माधव यांचे मागील एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी सकाळी अरुणाबाई प्रातर्विधीसाठी घराच्या खालच्या बाजूला जात होत्या. वाटेत माधव दबा धरून बसला होता. माधव याने कोयत्यासारख्या हत्याराने अरुणाबाई यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. यामध्ये अरुणाबाई गंभीर जखमी झाल्या. याबाबत त्यांचा मुलगा प्रदीप याने गुन्हा नोंदवला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.