Chikhali : भर दिवसा वाहन चालकाला जबरदस्तीने लुटून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी

Chikhali- In the daylight the driver was forcibly robbed and threatened with death

एमपीसी न्यूज – गॅस सिलेंडरचे वितरण करत असताना सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनचालकाला तीन जणांनी मिळून जबरदस्तीने लुटले. त्यानंतर चालकाला लाकडी दंडक्याने मारहाण करत जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 7) दुपारी घरकुल चिखली येथे घडली.

निहालसिंग गयाप्रसाद ठाकूर (वय 26, रा. कृष्णा नगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत उर्फ दाद्या मोरे (रा. घरकुल, चिखली) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठाकूर हे गॅस सिलेंडरच्या गाडीवर चालक म्हणून काम करतात. ठाकूर आणि त्यांचे सहकारी देवेंद्र शिवसिंग ठाकूर गुरुवारी दुपारी घरकुल चिखली येथे गॅस सिलेंडरचे वितरण करत होते.  घरकुल, चिखली येथील पुण्यनगर हाऊसिंग सोसायटीजवळ टेम्पोमध्ये थांबले असता आरोपी तिथे आले. टेम्पोच्या दरवाजाच्या काचेतून हात घालून आरोपींनी फिर्यादी ठाकूर यांच्या खिशातून 5 हजार 450 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादी ठाकूर गाडीच्या खाली उतरले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करून हात, पाठीवर, कानावर आणि पायावर गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी ठाकूर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.