Chikhali : नोकरीच्या आमिषाने तरुणीची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी देण्याच्या आमिषाने तरुणीकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 60 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊनही तिला नोकरी दिली नाही. यावरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 10 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली.पूजा रामकृष्ण याकू सुभाष (वय 25, रा. जिजामाता पार्क, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कुणाल सिंग, अनुग पाठक, अर्पित जैन आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूजा यांना नोकरी लावण्याचे आरोपींनी अमिष दाखवले. त्यांनी पूजा यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी, इंटरव्ह्यू ट्रेनिंग फी, बंदपत्रासाठी अकाउंट आणि सुरक्षेच्या कारणासाठी अशा वेगवेगळ्या कारणासाठी एकूण 60 हजार 200 रुपये घेतले. पैसे घेऊन काही दिवसांचा कालावधी गेल्यानंतर देखील पूजा यांना नोकरी दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पूजा यांनी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.