Chikhali Crime News : चिखलीतील पांग्या जाधव टोळीवर मोका; सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डही कारागृहात

Mocca on Pangya Jadhav gang in Chikhali; criminal Akya Bond is also in jail

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार पांग्या जाधव टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. या सहा जणांच्या टोळीमध्ये चिखली परिसरातील सराईत गुन्हेगार आक्या बॉण्डचा देखील समावेश आहे.

टोळी प्रमुख विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय 22, रा. जिजामाता हाऊसिंग सोसायटी, स्पाईन रोड, शरदनगर, चिखली), आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बाँन्ड पांडुरंग मोहोळ (वय 19, रा. महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), शोएब इजराईल शेख (वय 19, रा. साई कृपा हाऊसिंग सोसायटी, घरकुल, चिखली), विशाल रामधन खरात (वय 20, रा. फातिमा मज्जीद समोर, ओटास्किम, निगडी) आणि त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

15 मे रोजी पांग्या जाधव आणि त्याच्या साथीदारांनी एका तरुणावर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला केला होता. त्यामध्ये जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून पांग्या आणि त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चिखली पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करीत होते.

गुन्हेगारी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी टोळी बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले. तसेच या टोळीने परिसरात गंभीर स्वरूपाचे 18 गुन्हे केले आहेत.

त्यामुळे चिखली पोलिसांनी पांग्या जाधव टोळीवर मोकाची कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार केला.

चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी हा प्रस्ताव तयार करून अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवला. पीसीबीचे पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी प्रस्तावित कागदपत्रांची छाननी केली.

त्यांनतर अपर पोलीस आयुक्तांनी 10 ऑगस्ट रोजी पांग्या जाधव टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, पोलीस उप-आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील, संजय नाईक-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पीसीबीचे पोलीस हवालदार सचिन चव्हाण, चिखलीचे पोलीस हवालदार दत्ता कदम यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.