Chikhali : भंगार व्यावसायिकांना नोटीस; पालिका करणार धडक कारवाई 

एमपीसी न्यूज – चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील वायुप्रदुषण करणा-या 55 भंगार व्यावसायिकांना महापालिकेने नोटीस बजाविल्या आहेत. गोडावून काढून टाकण्याचे ताकीद दिली आहे. कारवाईसाठी पोलिसांकडे बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली असून बंदोबस्त मिळताच धडक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेने सांगितले आहे. 

महिन्याभरापूर्वी चिखलीतील कंपनीला आग लागली होती. त्याचा रिव्हर रेसिडन्सीमधील नागरिकांना मोठा त्रास झाला होता. त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांसह परिसराची पाहणी केली होती. चिखली, मोशी, कुदळवाडी परिसरातील भंगार व्यावसायिक दुरुउपयोगी साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात धूर व दुर्गंधी पसरते. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वायूप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना पालिकेतर्फे देण्यात येणा-या सोयी-सुविधा बंद कराव्यात. भंगार व्यावसाय बंद करावा, असे सक्त निर्देश आमदार महेश लांडगे यांनी दिले होते.

त्यानंतर महापालिकेने वायुप्रदुषण करणा-या भंगार व्यावसायिकांना नोटीस देण्यास सुरुवात केली. आजपर्यंत 55 भंगार व्यावसायिकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. तातडीने गोडावून काढून घेण्याचे नोटिसीत म्हटले आहे. चिखली, मोशी, कुदळवाडी या ठिकाणी नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात भंगार, जुन्या वस्तू, प्लास्टिक वस्तू गोळा करणारे व्यावसायिक आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात गोडावने आहेत. व्यावसायिक वापरासाठी योग्य नसलेल्या साहित्याची जाळून विल्हेवाट लावतात. त्यामुळे या धूर आणि दुर्गंधीयुक्त वायू पसरतो. याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. रहिवाश्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

उपअभियंता विजय भोजने म्हणाले, ‘वायुप्रदुषण करणा-या 55 भंगार व्यावसायिकांना नोटीसा दिल्या आहेत. महापालिकेकडून भंगार गोडावूनवर धडक कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पोलिसांकडे बंदोबस्त मागविला आहे. बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.