Chikhali : नेवाळे वस्ती मध्ये एकाचा खून; शहरात दोन दिवसात चौथा खून

एमपीसी न्यूज – निगडी, तळेगाव, हिंजवडी नंतर चिखली परिसरात देखील एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसात आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल चार खून झाले आहेत. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली असून चिखली मधील घटना आज (मंगळवारी, दि. 21) सकाळी उघडकीस आली आहे.

वीरेंद्र वसंत उमरगी (वय 42) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली मधील नेवाळे वस्ती येथे गणेश सिद्धी पार्क मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आज (मंगळवारी, दि. 21) सकाळी आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा खुनाचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

धक्कादायक! दोन दिवसात चार खून 

निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओटास्कीम येथे पाच जणांनी मिळून एका व्यक्तीचा डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 20) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची दुसरी घटना घडली. सोमवारी सकाळी घोरावडेश्वर डोंगरावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. याप्रकरणी सुद्धा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची तिसरी घटना उघडकीस आली. सोमवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सूस येथे एकाचा खून झाला. या खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खुनाची चौथी घटना आज चिखली परिसरात घडली आहे. चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.