Chikhali News : घरात खेळताना पडद्याचा गळफास बसल्याने चिमुरडीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरात खेळत असताना खिडकीच्या पडद्याचा गळफास बसल्याने आठ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी अडीचच्या सुमारास रुपीनगर, तळवडे येथे घडली.

सुमैय्या सफिल शेख (वय 8, रा. रुपीनगर) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमय्याचे वडील सकाळी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यानंतर, आई देखील खरेदी करण्यासाठी पिंपरी येथे गेली. दरम्यान, सुमैय्या मोठ्या बहिणींसोबत घरातच होती. सुमैय्या एका खोलीत आणि तिच्या बहिणी दुसऱ्या खोलीत होत्या. पडद्याशी खेळत असताना अचानक तिच्या गळ्याभोवती फास अडकला.

दुसऱ्या खोल्यांमध्ये असलेल्या बहिणींना काही कळायच्या आत सुमय्याचा तडफडून मृत्यू झाला. सुमैय्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शेख दाम्पत्यांना चार मुली असून सुमैय्या ही सर्वात लहान होती. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.