Chikhali News : कुदळवाडीत जलद ताप सर्वेक्षण पथकाची नियुक्ती करा : दिनेश यादव 

एमपीसीन्यूज : पावसाळ्यात डेंग्यू, कावीळ, अतिसार, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढतेय. कुदळवाडी परिसरातदेखील मलेरियासह तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे प्रभागात धुरीकरण व औषध फवारणी, जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती व तापाच्या रुग्णांची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे, अशी मागणी फ प्रभागाचे स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, प्रभागात घाणीचे साम्राज्य आणि पाण्याच्या डबक्यांमुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून, तेथील स्वच्छतेसाठी पालिका स्तरावर कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया या संशयित रुग्णांच्या संख्येत प्रभागात लक्षणीय वाढ झाली आहे.

उपचार सुरू असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यासाठी प्रभागात धुरीकरण व औषध फवारणी, जलद ताप सर्वेक्षणासाठी टीमची नियुक्ती व तापाच्या रुग्णांची नोंद घेण्यासाठी वैद्यकीय पथक नेमावे व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.