Chikhali News: जलशुद्धीकरण केंद्र ते देहू जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन

Chikhali News: Bhumi Pujan of Dehu Waterworks from Water Purification Center पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी सर्वप्रथम 1984 मध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सद्यस्थितीला शहराची लोकसंख्या सुमारे 27 लाखांच्या घरात आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथील नियोजित जलशुद्धीकरण केंद्र ते देहू अशुद्ध जलउपसा केंद्रापर्यंत एम. एस. जलवाहिनी पुरवणे व टाकण्याच्या कामाचे महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते मंगळवारी (दि.11) भूमिपूजन करण्यात आले. यामुळे भोसरीतील समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.

यावेळी आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी उपस्थित होते.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी सर्वप्रथम 1984 मध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सद्यस्थितीला शहराची लोकसंख्या सुमारे 27 लाखांच्या घरात आहे. आजही तेवढेच पाणी शहराला मिळते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई भासत आहे. महापालिकेच्या वतीने चिखली येथे 100 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे.

चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प ते देहूपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. एम.एस. प्रकारातील या जलवाहिनीचा 1250 ते 1400 इतका डायमीटर आहे. 10 किलोमीटर लांबीच्या या जलवाहिनीतून 100 एमएलडी इतके पाणी उचलण्यात येईल. देहू येथे इंद्रायणी नदीतून पाणी उचलण्यात येणार आहे. ते पाणी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पात आणले जाईल.

शुद्ध केलेले पाणी चऱ्होली, मोशी, डुडूळगाव, तळवडे, दिघी, चिखली आदी समाविष्ट भागात पुरवठा करण्यात येईल. या भागात होणाऱ्या नवीन प्रकल्पांनाही त्याला फायदा होणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावरील ताण कमी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.