Chikhali News: डिलिव्हरी देण्यासाठी नेलेल्या जॉबची विल्हेवाट लावून कंपनीला 62 लाख 54 हजारांचा गंडा

शेलार वस्ती येथील रवी इंडस्ट्रीज या कंपनीचा कंडेनसॅट टँक हा 62 लाख 54 हजार रुपये किमतीचा जॉब झारखंड येथील एनटीपीसी या कंपनीत वेळेत पोहचवितो, असे सांगून आरोपी यांनी विश्वास संपादन केला.

एमपीसी न्यूज – कंडेनसॅट टॅंक हा जॉब झारखंड येथील कंपनीत वेळेत पोहोचवितो असे सांगून कंपनीचा विश्वास संपादन केला. मात्र गाडी भाड्याची रक्कम वेळोवेळी वाढवून जॉबची विल्हेवाट लावली. त्यामुळे कंपनीचे 62 लाख 54 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. हा प्रकार 31 डिसेंबर 2019 पासून 8 ऑगस्ट 2020 या कालावधीत घडला.

आप्पासाहेब बाबूराव गायकवाड (वय ३४, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजित भोसले, अजित सिंग, भोलाराम, प्रकाश अगरवाल (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलार वस्ती येथील रवी इंडस्ट्रीज या कंपनीचा कंडेनसॅट टॅंक हा 62 लाख 54 हजार रुपये किमतीचा जॉब झारखंड येथील एनटीपीसी या कंपनीत वेळेत पोहचवितो, असे सांगून आरोपी यांनी विश्वास संपादन केला.

तसेच आरोपी यांनी संगनमत करून गाडी भाड्याची रक्कम वेळोवेळी वाढवून त्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीकडे 21 लाख 75 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर जॉब विकून टाकू, अशी भिती दाखवून जॉबची स्वत:च्या फायद्यासाठी विल्हेवाट लावून फिर्यादी यांच्या कंपनीचे आर्थिक नुकसान केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.