Chikhali News : पवारवस्ती येथे झालेल्या भांडण प्रकरणात परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – ‘आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो’ असे म्हणत सात जणांनी दोघांना मारहाण करून त्यातील एकावर खुनी हल्ला केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याच्या परस्पर विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा जणांनी मिळून एका तरुणाला आणि त्याच्या साथीदारांना मारहाण केल्याचे परस्पर विरोधातील फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना सोमवारी (दि. 16) मध्यरात्री सव्वाबारा वाजता पवारवस्ती चिखली येथे घडली.

राहुल रमेश रेड्डी (वय 18, रा. कासारवाडी), गणेश पवार (रा. पवारवस्ती, चिखली) अशी जखमींची नावे आहेत. राहुल यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कमलेश क्षीरसागर, दानेश, आदित्य पुजारी, गणेश चंद्रकांत सिंगुलवार (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली), सिराज अन्सारी, बाजीराव मिसाळ, अक्षय शेडगे (रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री त्यांचा मित्र गणेश पवार कपडे  खरेदीसाठी गेले. कपडे खरेदी केल्यानंतर रात्री उशिरा ते दुकानातून घरी पायी चालत निघाले. गणेश पवार सोबत पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी एका रिक्षातून आले. त्यांनी गर्दी जमवून कमलेश क्षीरसागर याने ‘का रे तुला मस्ती आली का. तू भाई झाला का’ असे म्हणून रॉडने गणेशला मारले.

त्यानंतर आरोपी दानेश याने ‘आम्ही कुदळवाडीचे भाई आहोत, आमच्या नादाला लागला तर तुझी गेम करतो’ असे म्हणत गणेशला शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी राहुल हे भांडण सोडविण्यासाठी गेले. सिराज अन्सारी याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीवर वार करत खुनी हल्ला केला. पोलिसांनी गणेश सिंगुलवार याला अटक केली आहे.

याच्या परस्पर विरोधात गणेश चंद्रकांत सिंगुलवार (वय 21, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश पवार, नन्या पवार, वृषभ मांडके, घनश्याम यादव उर्फ बंटा, राहुल मेड्डी, ओंकार आंग्रे (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र फिर्यादी रिक्षातून जात होते. त्यावेळी आरोपी गणेश पवार हा रस्त्याने जाताना दिसल्याने कमलेश क्षीरसागर याने रिक्षा थांबवण्यास सांगितले. दानेश व कमलेश हे दोघेजण रिक्षातून उतरून गणेश पवार याच्याकडे गेले असता ‘तुमच्या एरियात आल्यावर मला ढोस देता का, आता तुम्ही माझ्या एरियामध्ये आला आहे. आत्ता तुम्हाला दाखवतो माझी दहशत कशी आहे ते’ असे म्हणून दानेशला मारहाण केली.

त्यानंतर गणेश पवार याने त्याच्या पाच साथीदारांना बोलावून फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना चाकू, कोयत्याने मारले. फिर्यादी यांच्या रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादीचा मित्र कमलेश क्षीरसागर याला शोधत आरोपी त्याच्या घरी गेले. कमलेशच्या आईला दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.