Chikhali News : गुंजकर हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करा : मीनल यादव

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील गुंजकर हॉस्पिटलने कोरोना रुग्णाचे अवाजवी बिल दिले. याबाबत नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने ऑडिट करून एक लाख 59 हजार 900 रुपये नातेवाईकांना परत करण्याचे आदेश दिले. याची अंमलबजावणी दहा दिवसानंतर देखील हॉस्पिटलने केली नाही. त्यामुळे गुंजकर हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेविका मीनल यादव यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.

नगरसेविका मीनल यादव यांनी याबाबत आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, राजेंद्र जिजाबा तांबे यांचे कोरोनामुळे 3 जून रोजी निधन झाले. ते चिखली मधील गुंजकर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. हॉस्पिटलने अवाजवी खर्च दाखवून त्यांच्या नातेवाईकांकडून मोठ्या प्रमाणात बिल वसूल केले. तीन वेगवेगळी बिले वेगवेगळ्या वेळेस देण्यात आली. यावर नातेवाईकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे तक्रार केली.

त्या बिलाचे ऑडिट करून वैद्यकीय विभागाने 11जून रोजी आदेश दिले की तांबे यांच्या नातेवाईकांना एक लाख 59 हजार 900 रुपये परत करावे. या आदेशाला दहा दिवस उलटून गेले असून दवाखान्याकडून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. नातेवाईक दवाखान्यात गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळतात.

अशा प्रकारच्या अनेक केसेस या दवाखान्यात घडलेल्या आहे. अनेक नागरिकांनी नगरसेविका यादव यांच्याकडे तक्रारही केली आहे. त्यामुळे गुंजकर हॉस्पिटलवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नगरसेविका यादव यांनी केली आहे.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.